संजय चौपाने : पत्रकार हेमंत जोशी

संजय चौपाने : पत्रकार हेमंत जोशी 


मी तुम्हाला नेहमीच सांगत आलोय कि माझ्यात आणि गाव न्हाव्यात फारसा फरक नाही, गावातले सारे जसे एकमेव न्हाव्याकडे केस कर्तनाला येतात तेच माझेही, अख्य्या राज्यातून राजकीय वर्तुळात वावरणारे मुंबईत मला अधून मधून भेटून जातात, मग ते कुठल्याही राजकीय पक्षातले असलेत तरी, संजय चौपाने त्यातलाच एक मित्र होता…काल म्हणजे १३ ऑगस्टला त्याचे औरंगाबादजवळ अचानक दुर्दैवी निधन झाले. मृत्यू आला कि तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही, संजयला देखील धडधाकट अगडबंब ताकदवान फॉर्च्युनर वाचवू शकली नाही…


रविवारी संजय गेला, तत्पूर्वी म्हणजे फारतर बुधवारी मी अधिवेशन सुरु होते म्हणून विधान भवनात गेलो होतो, मित्रवर्य आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंच्या दालनात सहजच त्यांना भेटायला गेलो, सारे जेवत होते, माणिकरावांच्या ती नेहमीची पद्धत आहे, अधिवेशन काळात ते केबिन मध्ये येतील त्या साऱ्यांना जेवायला घालतात, मी भेटायला गेलो तेव्हा माणिकरावांसहित काही मंडळी तेथे जेवत बसली होती, संजय चौपानेही होता, माझा तसा तो जुना मित्र, ऐन तारुण्यात तो दिवाळी अंक काढणार्या त्याच्या आईसंगे म्हणजे 

तिचे बोट पकडून यायचा तेव्हापासून माझी त्याच्याशी ओळख आणि मैत्री देखील, तसा तो यवतमाळचा म्हणजे विदर्भातला त्यामुळे खायला आणि गप्पा मारायला एकदम मोकळा ढाकळा, हळू हळू तो काँग्रेस पक्षात आणि ठाण्यात रुळला आणि अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमय झाला, एवढा कि त्याचा मृत्यू देखील काँग्रेसची सेवा करतांनाच झाला, पक्षाने त्याला अविरत सेवा करूनही कधीच फारसे काही दिले नाही पण तरीही त्याने कधीच काँग्रेस सोडली नाही, मिळालेल्या मिळणाऱ्या पक्ष संघटनेतल्या पदावर तो आनंद मानायचा…

संजय मंत्रालयात किंवा त्याच्या पक्ष कार्यालयात भेटला कि तेवढ्यापुरत्या गप्पा व्हायच्या पण लिखाणात एखादा राजकीय संदर्भ लागला कि त्याला फोन करणे व्हायचे मग तो मनसोक्त माहिती देऊन मोकळा व्हायचा. पर्वा माणिकरावांकडे तो जेवतांना भेटल्यानंतर मी त्याला गमतीने म्हणालोही,संजय केवढा रे अगडबंब वाढला आहेस, पुढले किमान सहा महिने तरी जेवू नकोस, आणि तो नेहमीप्रमाणे खळखळून हसला…

आज त्याच्या अपघाती निधनाची बातमी कानावर आली, हसतमुख आणि गप्पिष्ट संजयचे हे असे अचानक निघून जाणे, डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या. देवा येथे काँग्रेस ने अजिबात त्याच्यासाठी काही केले नाही वर तुझ्याजवळ आलाय तर किमान तिथे तरी त्याचे भले कर…

मनापासून श्रद्धांजली..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *