वसंतराव माझे चुकले : पत्रकार हेमंत जोशी


वसंतराव माझे चुकले : पत्रकार हेमंत जोशी 

दिनांक 11 जून गुरुवारची रात्र मला अस्वस्थ करून सोडणारी ठरली, माझे पित्यासमान वसंतराव कुलकर्णी मला आम्हा अनेकांना सोडून गेले. कोण होते वसंतराव, सांगितले तर तुम्हालाही आस्चर्य वाटेल, ते 80-90 च्या दशकात विविध मंत्र्यांचे खाजगी सचिव होते नंतर ते त्यावेळेच्या राज्यपालांचे सचिव होऊन निवृत्त झाले आणि सतत सत्तेभोवताली रमलेला हा अधिकारी दूर थेट पन्हाळ्याला निघून गेला आणि तेथेच लोकसेवा करता करता 11 जून ला आम्हाला कायमचा सोडून गेला नक्की थेट स्वर्गातच पोहोचला कारण या हाताचे त्या हाताला कळू न देता प्रत्येकाला भरभरून देणारा तो एक आधुनिक मसीहा संत होता. कित्येकांचे संसार त्यांनी उभे केले कित्येकांना त्यांनी पोटापाण्याला लावले. एखादा मंत्र्यांचा साधा खाजगी सचिव एकेकाळी शरद पवार ते थेट राज्यपाल प्रत्येकाचा कसा आणि किती लाडका ठरू शकतो हे त्यांच्याकडून मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी सरकारी अधिकाऱ्यांनी खरोखरी शिकण्याससारखे होते. माझ्या वडिलांना तर त्यांच्या मृत्यूच्या केवळ दोन महिने आधी त्यांनी वचन दिले होते कि मी हेमंत कडे मुलासारखे लक्ष ठेवेन त्यांनी ते दिलेले वचन अगदी शेवटपर्यंत पाळले…

वसंतराव माझा भावनिक आधार होते, माझ्या मनातले सारे सुख आणि दुःख त्यांना माहिती होते कारण माझे दुःख हलके करण्याचे मी ते हक्काचे ठिकाण समजत असे विशेष म्हणजे त्यांच्या या दानशूर कर्ण वृत्तीला त्यांच्या पत्नीने कायम साथ दिली, देत आल्या. ज्या जोडप्याकडे बघून कायम वाटावे कि यांचे कालच लग्न झाले आहे कि काय त्यातले कुलकर्णी दाम्पत्य होते. माझा त्यांच्या घरी दारी कायम मुक्त संचार होता, मला तर वडील गेल्याचे दुःख झाले. नोकरीत असतांना ते मुंबईत होते त्यानंतर ते पुण्यात जवळपास 7-8 वर्षे होते म्हणजे 17-18 वर्षे सतत त्यांनी स्वतः कोणतीही माझ्याकडून अपेक्षा न ठेवता माझ्या पैशांचे अगदी व्यक्तिगत बँकेत जाऊन नियोजन केले त्यामुळेच मला आर्थिक सुबत्ता आली, एका मंत्र्यांचा खाजगी सचिव माझ्या खडतर आक्रमक बेभरवशाच्या आयुष्यात साक्षात देवदूत बनून आला व माझे कल्याण करून गेला. अलीकडे काही कटकटींमुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे या दीड दोन वर्षात त्यांच्याशी बोलणे होत नव्हते ती खंत यापुढे मला कायम अस्वस्थ करून सोडणारी असेल…

दिवंगत श्री आर आर पाटील यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात जे भरीव कार्य केले त्या योगदानात त्यावेळेचे सचिव सुधीर ठाकरे, आबांचे त्यावेळेचे खाजगी सचिव चंद्रकांत दळवी आणि ग्राम विकास खात्याचे उपसचिव म्हणून वसंतराव कुलकर्णी या तीघांचाच सिंहाचा वाटा होता. वसंतराव ज्यामंत्र्यांकडे खाजगी सचिव म्हणून रुजू व्हायचे तो मंत्री हमखास यशस्वी ठरे विशेष म्हणजे त्याकाळी हे सांगतील ते खाजगी सचिव किंवा स्वीय सहाय्यक इतर मंत्री मुद्दाम घेत असत एवढा ब्राम्हण असूनही  वसंतरावच्या शब्दाला मानसन्मान होता. त्यांना मी अवतार मधला राजेश खन्ना म्हणत असे कारण सेवा निवृत्तीनंतर सरकारी अधिकारी फारसे वेगळे काही करतांना दिसत नाही, वसंतराव मात्र स्विमिंग ड्रायविंग तर शिकलेच पण त्यांनी फेंगशुई शास्त्राचा सखोल अभ्यास करून त्यानंतर जगभर आपले फॉलोअर्स निर्माण केले जे कार्य त्यांनी आपल्या खिशातले पैसे टाकून केले अन्यथा या क्षेत्रात देखील त्यांना तेही निवृत्तीनंतर करोडो रुपये मिळविता आले असते. प्रत्येक नातेवाईकाचे ते जसे अगदी तरुण वयापासूनपित्यासमान होते तीच जबाबदारी त्यांनी बाहेरच्या जगात देखील पार पाडली एवढे ते श्रेष्ठ होते दानशूर मोठ्या मनाचे होते. अशी पुण्यवान माणसे खचित जन्माला येतात आणि तुम्हाला भेटतात. वसंतरावांना श्रद्धांजली वाहतांना मला खूप खूप खूपच दुःख होते आहे, माझे अपरिमित नुकसान झालेले आहे…

हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *