विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या २ : पत्रकार हेमंत जोशी
एकदा जवळचा मित्र बायकोची गाऱ्हाणी सांगत बसला होता, मी इकडे दिवसभर राबतो ती तिकडे वेगवेगळ्या मित्रांबरोबर मजा मारत फिरते वरून माझ्यावरच संशय घेते. तेवढ्यात तिचाच त्याला मेसेज आला, काय चालू आहे असा. बायको, असे तिला उत्तर पाठव, मी म्हणालो. त्याने तेच केले, ती नेमकी त्यावेळी मित्राचा मुका घेत होती, चपापली असावी, कारण त्यानंतर तिने त्याला कधीही असा मेसेज केला नाही. विशेषतः मीडिया क्षेत्रात असणाऱ्यांना माझे नेमके हेच सांगणे असते कि सतत लोकांची लफडी बाहेर काढतांना स्वतः देखील समाजासमोर गुण दोषांसहित सामोरे जा, दुसऱ्याचे बघावे वाकून आणि स्वतःचे ठेवावे झाकून, पद्धतीने वागू नका अन्यथा येथेच या हातावरचे त्या हातावर फेडून मोकळे व्हावे लागते, तोंडात विष्ठा असतांना श्रीखंड चघळतोय, खोटे सांगू नका, आपल्याकडे बघणारे, जवळपास वावरणारे आपल्यापेक्षा कित्येक पटींनी चतुर असतात हे मीडियातल्या मंडळींनी अजिबात विसरता कामा नये. याआधी देखील मीडियावर काल मी लिहिले, काय सांगू, दिवसभरात असे ५१ फोन आलेत ज्यांनी मला विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांमधल्या कितीतरी भानगडी पुराव्यांसहित सांगितल्या ज्या ऐकून मीडिया किती खालच्या थरातली, मी मनाशी म्हणालो पण दिवसभर अतिशय अस्वस्थ होतो. वाहिन्यांमध्ये तर एकमेकांशी एवढी वैर भावना असते कि एखाद्याला संपवतांना उध्वस्त करतांना त्यातले खलनायक कोणत्याही थराला जातात. अशाच एका अतिशय दर्जेदार अँकरला तो केवळ ब्राम्हण आहे म्हणून त्याच्या नव्याने आलेल्या ब्राम्हण नसलेल्या बॉसने संपादकाने वाहिनीतून घालविल्यानंतर या अँकरला इतर कुठे नोकरी मिळेना म्हणून शेवटी तो घरच्या घरी पोळी भाजी केंद्र चालवू लागला, या कठीण काळात त्याची बायको पोटच्या मुलासहित बाहेर पडली वरून तिने घटस्फोटासठी न्यायालयात अर्ज केला. महत्वाचे म्हणजे ज्याने त्याला नोकरीतून घालविले आज तो संपादक देखील रस्त्यावर आलाय…
व्यवहारात किंवा राजकारणात किंवा दोन्हीकडे आपल्यापेक्षा आपल्या हाताखालच्या काम करणाऱ्याला अधिक रस आहे हे काही वृत्तपत्र किंवा वाहिन्या मालकांच्या लक्षात येते काहींच्या लक्षात येत नाही, ज्यांच्या लक्षात येत नाही त्या मालकांकडे काम करणारे मालकाच्या तोडीचे होऊन मोकळे होतात, भारतकुमार राऊत संजय राऊत कुमार केतकर इत्यादी जे थेट खासदार होऊन मोकळे झाले पण लोकमत चे दर्डा बंधू किंवा झी वाहिनीचे सुभाषचंद्र गोयल यांच्या ते लगेच लक्षात येत असावे कि आपल्या हाताखाली काम करणारा आपल्याला टांग देऊन आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात खुबीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय अशावेळी ते लगेच अशा अति महत्वाकांक्षी स्टाफचे पंख छाटून त्याला जमिनीवर अलगद उतरवून मोकळे होतात त्यामुळेच जुगाड जमवून आणले असतानाही दर्डा बंधू यांनी एकेकाळी त्यांच्याकडच्या त्यांच्या पुढे जाऊ पाहणाऱ्या मधुकर भावे यांचे असे काही पंख कापले आमदार होणे दूर पण त्यांना लोकमत मधून बाहेर पडल्यानंतर दैनिक एकमत दैनिक राम प्रहर दैनिक प्रहार असा त्यांचा वृत्तपत्रातला उतरत्या क्रमाने प्रवास सुरु होऊन शेवटी शेवटी तर त्यांचा सिनेमातला भारत भूषण झाला, माझ्या तर कानावर असेही आले होते कि ते कुठल्याशा दरोडेखोर नामक साप्ताहिकाचे देखील संपादक होणार होते. जर एखाद्याला मोठ्या राजकीय किंवा आर्थिक महत्वाकांक्षा असतील तर मला वाटते अशांनी स्वतःचे वृत्तपत्र किंवा वाहिनी उभी करून मोठी करून मनातल्या सुप्त इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण कराव्यात, चतुर कपिल पाटील व्हावे, अर्थात असे कितीतरी मधुकर भावे, मी अति महत्वाकांक्षेपायी वरून खाली कोसळताना, झपाट्याने खाली उतरतांना बघितले आहेत. सुभाषचंद्र गोयल किंवा दर्डा बंधू यांच्या व्यावसायिक नजरेतून बघतांना तेच लक्षात येते कि ते प्रसंगी टॉपवरून तळाला आपली वाहिनी आणून ठेवतील पण एकदा का हाताखालचा त्यांच्याच खांद्यावर चढून त्यांच्याच कानात मुतायला लागला तर ते अशांना पार दरीत ढकलून मोकळे होतात, नेस्तनाबूत करून मोकळे होतात…
गेल्या मार्च पासून कोरोना महामारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पसरल्याने तसेही या राज्यात साऱ्याच वृत्तपत्रांचा खप झपाट्याने खाली आला, जर काही वृत्तपत्रे केवळ शासकीय जाहिराती लाटण्याच्या लुटण्याच्या उद्देशाने आकडा फुगवून सांगत असतील तर सरकारमध्ये दम असल्यास त्यांनी नेमके सत्य शोधावे आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून होणारी पैशांची मोठी लुट थांबवावी संपवावी. अत्यंत महत्वाचे म्हणजे दररोज सकाळी वृत्तपत्रे न वाचल्यास फारसे काहीही बिघडत नाही हे लोकांच्या लक्षात आल्याने यापुढे तसेही आपले देखील अमेरिकेसारखे नक्की होणार आहे, पैसे मोजून वृत्तपत्रे विकत घेणे, हे प्रकार नक्की संपणारे आहेत. जशी वृत्तपत्रांची विश्वासहर्ता या कोरोना महामारीने झपाटयाने संपवली आहे तेच उद्या आक्रस्ताळ्या बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांचे देखील नक्की होणार आहे, घडलेही आहे, दर्शकांना आता मराठी वाहिन्यांच्या बातम्या देखील नकोशा होऊ लागल्या आहेत. आम्ही मीडिया अतिशय वेगाने लोकांचा विश्वास गमावून बसलो आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी