मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी
पुढल्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल तसेच महामंडळावरील नियुक्त्या झाल्या नाहीत तर जे मतदारांमधून निवडून आलेले आमदार आहेत त्यातल्या अनेकांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करवून घ्यावे लागतील, काही आमदार संतापाच्या भरात रस्त्याने सैरावैरा धावत सुटतील, काह पुरुष आमदार कपडे फाडून घेतील आणि डोक्यावरचे केस उपटत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वेड लागल्यागत धावत सुटतील, काही आमदार दुःखसागरात बुडून जातील आणि रफी लताची जुन्या सिनेमातली रडवणारी गाणी एकतर ऐकतील किंवा मिणचेकरांसारखे आमदार स्वतःच गाऊन दाखवतील. महिला आमदार उपवास ठेवतील आणि नेत्यांच्या नावाने अगदी चार चौघात कडाकडा बोटे मोडतील, सारेच नेत्यांच्या नावाने शिमगा साजरा करतील, अनेकांना निद्रानाश जडेल, त्यातले काहीतरी अस्वस्थ होऊन जमिनीवर लोळण घेतील, काही मोठ्याने मध्येच उठून हंबरडा फोडतील…
ज्यांना कवडीची अक्कल नाही किंवा जे विधान परिषदेत आयत्या बिळावर नागोबा पद्धतीने जाऊन बसले आहेत त्यांना मंत्रिपद बहाल केल्या गेले आहे आणि जे सतत लोकांमधून मोठ्या मुश्किलीने निवडून येतात त्यांना यावेळी म्हणजे तब्बल १५-१६ वर्षानंतर युतीची सत्ता आल्यानंतरही जर अमुक एखादे महत्वाचे मंडळ किंवा मंत्री, राज्यमंत्रीपद मिळत नसेल तर त्यांनी झपाट्याने मतदार संघाची कामे कशी उरकायची आणि कोणत्या तोंडाने मतदारांसमोर मते मागायची, अशा अस्वस्थ मनस्थितीत ते सारे अडकलेले आहेत, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल जर पुढल्या काही दिवसात झाला नाही तर त्याचे अतिशय वाईट परिणाम सेना भाजपा युतीला भोगावे लागणार आहेत कारण जे मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत ते कार्यक्षम नाहीत त्यातले बहुतेक किंवा अनेक अकार्यक्षम आहेत आणि बहुतांश प्रशासकीय शासकीय अधिकारी जणू आपण आघाडीचे ताबेदार पद्धतीने वागत असल्याने ते युतीच्या आमदारांना फारसे सहकार्य न करता एकतर ते आघाडीच्या नेत्यांना, आमदारांना सहकार्य करून मोकळे होतात किंवा आपापली घरे भरून मोकळी होतात. राजीव निवतकर सारखे भ्रष्ट आणि आघाडीला जवळ करणारे प्रशासकीय अधिकारी जर या राज्यात मुख्य सचिवांच्या कार्यालयात यावेळीही मोक्याच्या जागेवर बसून केवळ स्वतःच्या श्रीमंतीत भर घालण्यात विकृत आनंद घेत असतील तर युतीच्या आमदारांनी जिंकायचे कसे किंवा निवडून यायचे तरी कसे. अतिशय भ्रष्ट, बदनाम आणि बदमाश असलेले शासकीय किंवा प्रशासकीय अधिकारी मोक्याच्या महत्वाच्या पदावर बसणार नाहीत याची वास्तिव डोळ्यात तेल घालून मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी काळजी घ्यायला हवी होती, दुर्दैवाने ते घडले नाही, यावेळीही हिरालाल सोनवणे सारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपात घोळवल्या गेली, अशांनीच मजा केली…
जाऊद्या वेगळ्या विषयाकडे वळतो. अलीकडे मॉरिशसला उद्योगपती असलेल्या ब्राम्हणांची व्यावसायिक परिषद होती, पुण्यातून जवळपास ५५-६० ब्राम्हण व्यावसायिक स्थानिक आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेला गेले होते. ब्राम्हण तेही पुण्यातले आणि एकाचवेळी ५०-६०, जर मी त्यांचे नेतृत्व केले असते तर परतल्यानंतर तुम्ही सारे मला भेटायला सांताक्रूझ ऐवजी ठाण्याला आले असते. मेधाताई कुलकर्णीची कमाल आहे त्या जाहीर सत्कार आणि कौतुकास पात्र ठरल्या आहेत. माझे मुंबईतले एक व्यावसायिक मित्र देखील सदर परिषदेस गेले होते कारण त्यांचे तेथे भाषण होते, विशेष म्हणजे पुणेकर बुद्धिमान ब्राम्हणांनी या मित्राचेही भाषण योग्य ठिकाणी टाळ्यांनी दाद देऊन ऐकले कारण मागे एकदा वागळेंचे जेव्हा पुण्यातल्या ब्राम्हणांसमोर भाषण झाले होते तेव्हा त्यांच्या भाषणाला नको त्या वाक्यांवर एवढ्या टाळ्या पडल्या कि वागळेंनी मध्येच भाषण सोडून आणि स्वतःच्या गालावर स्वतःच्याच टाळ्या मारून बाहेर पडले होते…
मेधाताई पुण्यातल्या अत्यंत यशस्वी आमदार आहेत आणि त्या खालून वर आल्या आहेत थेट आमदार म्हणून त्या निवडून आल्या नाहीत तर त्या आमदार होण्याआधी पुणे महापालिकेत तब्बल तीन वेळा आधी नगरसेविका म्हणून सतत निवडून आल्या, लोकप्रिय झाल्या नंतर त्या विधानसभेला उभ्या राहिल्या आणि तेथेही त्या निवडून आल्या, पुढल्या वेळीही त्या निवडून येतील, आमदार होतील. त्या एक स्त्री असल्याने त्यांचे वय विचारणे तसे घातक ठरेल पण एक नक्की आजचे त्यांचे जे काय वय असेल त्यापेक्षा त्या उत्साहाच्या बाबतीत शंभर टक्के किमान २० वर्षे तरी लहान वाटतात, एखाद्या तडफदार तरुण स्त्रीसारख्या सतत स्वतःला सार्वजनिक कामात आणि उपक्रमात गुंतवून ठेवतात. एकाचवेळी स्वतःचा संसार आणि उत्तमरीत्या मतदार संभाळणाऱ्या मेधाताई कुलकर्णी यांचे करावे तेवढे कौतुक कमी. त्यांच्यावर आणखी खूप काही लिहायचे आहे, येथे ते नक्की अपूर्ण आहे…
पत्रकार हेमंत जोशी