वृत्तपत्रांची आकडेवारी / लबाडी ३ : पत्रकार हेमंत जोशी
मराठी वृत्तपत्रांच्या खपाची खरी आकडेवारी जेवढी वाढत जाईल तेवढे अधिक चांगले लक्षण मानावे, इंग्रजी माध्यमातून शिकण्याची प्रत्येकाची धडपड तेव्हा मराठी यापुढे वाचल्या जाईल का, अशी शंका मनाला शिवत असतांना मराठी वृत्तपत्रांचा वाढणारा वाढलेला वाढत जाणारा हा खप निश्चित एक चांगले लक्षण मानावे. माझ्या कुटुंबात ९ सदस्य आहेत पण मराठी वृत्तपत्रे आम्ही दोघे वाचतो, माझ्या घरातल्या ७-८ वर्षांच्या सदस्याला देखील इंग्रजी वृत्तपत्र दरदिवशी सकाळी सकाळी वाचायचे असते आणि घरोघरी नेमके हेच वातावरण आहे तरीही जेव्हा मराठी वाचकांची आकडेवारी दैनिक सकाळ आणि लोकमत यांच्या मारामारीतून कळते तेव्हा आश्चर्य वाटते आणि आकडेवारी खरी असेल तर आनंद देखील मनाला होईल. बहुतेक सुशिक्षित घरातून इंग्रजी बोलणे आणि लिहिण्यावर भर दिल्या जातो तेवढेच महत्व एकाचवेळी इंग्रजी संगे मराठीला दिल्या गेले म्हणजे मराठी बोलण्यावाचण्याचा पाया जर भक्कम रोवल्या गेला तरच मराठीचे काही खरे आहे अन्यथा पुढे पुढे मराठी अतिशय रोडवत जाईल त्यावर शंका घेण्याचे अजिबात कारण नाही…
मराठी भाषा जगली पाहिजे मराठी माणूस व्यवसायातही पुढे गेला पाहिजे. श्रीमंत होण्याचा ठेका केवळ मराठीचा नसलेल्यांचाच नाही पण नियोजन न करता राजकारणातून दलालीतून सरकारी नोकरीतून काळा पैसा कोठून तरी आला कि व्यवसायात घालायचा आणि वाटोळे करून घ्यायचे हे जे अलीकडे अचानक नवश्रीमंत झालेल्यांच्या घरात फॅड आलेले आहे हेही मराठी माणसाचे वागणे योग्य नाही. एक उदाहरण देतो. अलिकडल्या काही वर्षात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उत्पादित वस्तूंना अतिप्रचंड मागणी वाढल्याने काही मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी एकत्र येऊन दादर पूर्वेला स्टेशनजवळ त्या वस्तू विकत मिळण्याचे भले मोठे मॉल वजा शोरूम काढले, दुकान थाटले. जवळचा काळा पैसा मागला पुढला कोणताही विचार न करता स्वतःला खूप चतुर समजणाऱ्या या खाजगी सचिवांनी त्या मॉल मध्ये ओतला, ज्यांच्या बायका ‘ हाऊसवाइफ’ होत्या त्यातल्या दोघी तिघी पूर्णवेळ लक्ष ठेवून होत्या तरीही हे रामदेवबाबांच्या देशी वस्तूंचे विक्री शोरूम अलीकडे बजेट बिघडल्याने त्यांना बंद करावे लागले त्यातल्या एकाने मला असे सांगितले कि एकतर प्रॉफिट ऑफ मार्जिन अतिशय कमी वरून ज्या वस्तूंना अधिक मागणी नेमक्या त्याच वस्तूंचा पुरवठा खूप कमी, त्यामुळे दुकान बंद करावे लागले. या खाजगी सचिवांची मोठी काळी कमाई अशी वाया गेली, मराठी माणसाने नियोजन केले पाहिजे, नियोजन शिकले पाहिजे अन्यथा अमराठी असेच आमच्या उरावर बसून मजा मारताहेत, मारत राहतील. चांगले दिसले कि करा सुरु असे व्यवसाय सुरु करतांना वागायचे नसते म्हणून या मुंबईत अनेक हेमंत जोशी व्हायला आले आणि प्रवीण गणोरकर होऊन म्हणजे वेड लागल्याने परत गेले, काळजीपूर्वक नियोजन हवे, मेहनत घ्यावी…
लोकमत, सकाळ, देशोन्नती, पुढारी, सागर, पुण्यनगरी, नवाकाळ, संध्याकाळ, लोकसत्ता, लोकमत किंवा अन्य असंख्य मान्यवर मराठी वृत्तपत्रांनी आपापसात निकोप स्पर्धा नक्की ठेवावी पण एकमेकांना संपविण्यात वेळ अजिबात दवडू नये, नुकसान आम्हा मराठी वाचकांचे मराठी लोकांचे होते. पूर्वीसारखे दर्जेदार वाचनीय संग्राह्य लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स किंवा गावकरी सारखे स्थानिक मराठी वृत्तपत्रे जर वाचायला मिळत नसतील तर ते घडणे म्हणजे एकप्रकारे मराठी वाचकांची हि अधोगती असे म्हणता येईल. न दिसणाऱ्या वर्तमानपत्रांचा कागदोपत्री मोठा खप बघून माझी मलाच लाज वाटते केवळ सरकारला लुटण्या साठी लढवल्या गेलेली हि वृत्तपत्रांची लबाडी, त्यातले नेमके सत्य न घाबरता सरकारने शोधले पाहिजे त्यावर दिल्लीत मोदी यांचे आणि मुंबईत फडणवीसांचे करावे तेवढे कौतुक कमी, त्यांनी या अशा बदमाश मीडियावर मोठा वचक बसविण्याचे काम केल्याने शासनाला लुटणार्या मीडियाचे धाबे नक्की दणाणले आहे त्यातून त्यांनी अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा मानसिक त्रास या नेत्यांना त्यांच्या पक्षाला दिला असल्याची माझी माहिती आहे. लोकांचा आजही मीडियावर विश्वास असल्याने त्याचा मोठा फटका नक्की मोदी, फडणवीसकिंवा भाजपाला बसणार आहे. येथे या राज्यातही मीडियातल्या काही मंडळींनी पैसेही स्वीकारले आणि बदनामीही केली त्यावर भाजपाच्या श्वेता शालिनी पुरावे समोर ठेवून सांगून मोकळ्या होतील, त्यांना बोलते करावे…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी