अरेरे ! विलासराव गेले वाईट वाटले…
—पत्रकार हेमंत जोशी
दादर पूर्वेला हिंदू कॉलनीत काही पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक इमारत बांधली त्या इमारतीचे मला दोन कारणांमुळे आकर्षण एकतर त्या इमारतीचे बुलेट हे नाव आणि तेथे राहणारे सुधाकर सुराडकर विलास देशपांडे सारखे माझे काही आवडते निवृत्त पोलीस अधिकारी पैकी विलासराव अलीकडे ३ सप्टेंबरला देवाघरी गेले, मापासून वाईट वाटले. वास्तविक कोरोना आड आल्याने माझी आणि विलासराव देशपांडे यांची अलीकडे भेट झाली नाही तरीही फोनवर एकमेकांची आठवण झाली कि आम्ही मनसोक्त गप्पा मारत असू त्या गप्पांमध्ये मग वाहिनी म्हणजे मिसेस देशपांडे पण सामील व्हायच्या त्याही एकदम साध्या आणि माझ्यावर दोघेही मनापासून प्रेम करणारे, माझ्या घरातल्या प्रत्येक समारंभात मनापासून सहभागी होणारे हे दाम्पत्य कारण विलासराव माझ्या गावातले आमच्या जळगाव जामोदचे आणि शून्यातून स्वतःचे मुंबईत आयुष्यात विश्व निर्माण करणारे अगदी सामान्य बेताच्या परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने तेही पोलीस खात्यात असूनही सद्विचार गाठीशी ठेवून साकारणारे माझे जवळचे आवडते स्नेही. तीच बात सुधाकर सुराडकर यांची, पोलीस कारकीर्द दणाणून सोडणारे हे निवृत्त आयपीएस अधिकारी पण सुराडकर यांच्याशी गप्पा मारणे किंवा साधे फोनवरूनही बोलणे म्हणजे ज्ञानाच्या धबधब्याखाली
मनसोक्त डुंबणे, त्यांचे विचार ऐकतांना मार्गदर्शन घेतांना मन तृप्त होते आणि भरूनही येते. विलासराव आणि त्यांचे धाकटे बंधू दिलीप देशपांडे जे विदर्भातले नावाजलेले आणि गाजलेले एकपात्री प्रयोग देशात परदेशात करणारे उत्तम कलावंत, काहीही म्हणा आमच्या छोटयाशा जळगाव जामोद चे पाणीच वेगळे ज्याची सुरुवात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली आणि आम्हीही मग हि कसर काही प्रमाणात भरून काढली. वास्तविक एकाच गावातले विशेषतः ब्राम्हण एकमेकांचे कौतुक करतांना मान वळवतात पण माझे गाव त्याला अपवाद ठरावे कारण गावकऱ्यांना जसे माझ्या लिखाणाचे लढण्याचे मनापासून कौतुक तेच साम्य दिवंगत विलासराव आणि त्यांचे बंधुराज दिलीप देशपांडे यात, दोघांनाही आणि अकोल्यातल्या दिवंगत स्वतंत्र सैनिक व पत्रकार अच्युतराव देशपांडे यांच्या कन्या असलेल्या आमच्या वहिनींना म्हणजे मिसेस विलासराव यांना देखील माझ्या प्रगतीचे व लिखाणाचे मनापासून कौतुक म्हणजे एखाद्यावेळी मला जरी विलासराव किंवा दिलीपभाईंना फोन करणे जमले नाही तरी या दोघातल्या एकाचा तरी फोन येणे क्रमप्राप्त होते नंतर मग अशाकाही गप्पा रंगायच्या किंवा रंगतात कि पुढले दोन दिवस हसून हसून पॉट दुखायला होते.
दारूच्या थेंबाला किंवा पोलीस अधिकारी असूनही व्यसनाधीन नसलेल्या विलासराव यांना अचानक लिव्हर सोरायसिस झाला आणि ते सिरीयस झाले तरीही त्यांचा अगदी अलीकडे म्हणजे १५ दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे फोन आला आणि आम्ही तिघेही त्यात मिसेस देशपांडे सहित सामील झालो हास्यकल्लोळात बुडालो, एखादा पोलीस अधिकारी साक्षात मृत्यू समोर असतांना देखील किती बिनधास्त जगतो हे फोन खाली ठेवतांना माझ्या त्या दिवशी लक्षात आले. प्रत्येकाकडे किंवा गावभर कौतुक करणे काय असते हे मी देशपांडे दाम्पत्य आणि दिलीपभाई यांचे माझ्याबद्दल असलेल्या अभिमानातून सतत अनेक वर्षे अनुभवले आहे कारण मी १९८७ दरम्यान कायमस्वरूपी मुंबईत आल्यानंतर हे नाते त्या आपुलकीतूनच जगले वाढले. असे माझे आवडते विलासराव अलीकडे स्वर्गवासी झाले म्हणून रडू आले. विलासराव पोलीस खात्यात होते ते नोकरीत खूप व्यस्त होते तरीही या दाम्पत्याने जमिनीवर राहून पोटच्या मुलास आणि मुलीस उत्तम शिकवून अत्योत्तम घडवून अमेरिकेत पाठबिले आणि मुले तेथेच कायम स्थिरावलेत्यावर करावे तेवढे कौतुक कमी. मनासारखे सून जावइ नातवंडे, विलासराव स्वतःच्या आयुष्यात खूप समाधानी होते अधूनमधून कायम अमेरिकेत दोघेही जाऊन मुलांचे कौतुक बघायचे, येथे आल्यावर मला हमखास सांगायचे, आज तेच विलासराव माझे पक्के वाचक माझे हितचिंतक माझे मार्गदर्शक माझे पाठीराखे आपल्यात नाहीत याचे राहून राहून वाईट वाटते आणि आमची शेवटची भेट झाली नाही त्यातून मन उदास व अस्वस्थ होते, विलासरावांना सॅल्यूट आणि श्रद्धांजली !!
तूर्त एवढेच : हेमंत जोशी