मराठी त्यातल्या त्यात आमचा वर्हाडी माणूस तास कमालीचा संशयी. मला वाटते 1995 ची ती विधान सभा निवडणूक असावी. विदर्भातल्या अकोल्यात ती निवडणूक चांगलीच गाजली, कारण त्यादरम्यान अगदी किरकोळ आणि पोराटोरांची वाटणारी शिवसेना आणि सेनेचे त्यावेळेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव गावंडे जिल्ह्यात प्रस्थ असलेले बाबासाहेब धाबेकर यांच्यासमोर उमेदवार म्हणून सर्व बाजूंनी अगदीच किरकोळ, बाबासाहेबांना त्यादरम्यान पराभूत करणे म्हणजे अमिताभ ऐवजी प्रमुख भूमिकेत दीपक करंजीकरांना घेण्यासारखे किंवा धाबेकर यांच्यासमोर गुलाबराव म्हणजे नितीन गडकरी यांच्यासमोर पराग सराफ पण सेनेने आव्हान स्वीकारले होते,
गावंडे विरुद्ध धाबेकर अशी ती लढत होती, गुलाबरावांसाठी ते आव्हान होते जणू एखाद्या मच्छरासमोर स्ट्रॉंग कीटकनाशक उभे होते. गुलाबरावांना कळतहोते, निवडणूक जिंकणे फार मोठे आव्हान आहे, ना पैसे ना मुबलक कार्यकर्ते, अर्थात मतदारांना काँग्रेस नकोशी झाली होती म्हणून त्यांचा ओढा खुपसा भाजप सेने युतीकडे होते, मात्र विदर्भ म्हणजे काँग्रेसचा हुकमी एक्का त्यात उमेदवार तगडा, अमुक एखाद्या कुस्तीच्या आखाड्यात दिलीप प्रभावळकर दारासिंग समोर जिंकतील का, असा काहीसा गोंधळ अकोल्यात होता पण
उत्साही शिवसैनिकांनी ते आव्हान स्वीकारले होते, समोर पराभव दिसत असतांना अतिशय संशयी, जुन्या विचारांना पकडून असलेल्या आमच्या विदर्भातल्या या मतदारसंघात गुलाब गॅंगकडून एक पुडी विशेषतः बाया बापड्यांमध्ये, बुजुर्ग मतदारांत अशी सोडण्यात आली कि बाबासाहेब प्रचार करतांना डोळ्यावर सतत जो कला गॉगल घालतात त्यातून समोरची स्त्री किंवा कुठलीही व्यक्ती नागडी दिसते. म्हणता म्हणता हा प्रसार अख्य्या मतदारसंघात झाला, कानोकानी बातमी गेली आणि मतदारांनी बाबासाहेबांकडे किंवा त्यांच्या सभांकडे पाठ फिरवली, व्हायचा तो परिणाम झाला केवळ त्या काळ्या काचांमुळे बाबासाहेब निवडणुकीत पराभूत झाले, गावंडे निवडून आले,
पुढे या राज्याचे वादग्रस्त सिंचन राज्यमंत्री म्हणून गाजले, त्या निवडणुकी दरम्यान बाबासाहेब समोर यायचा अवकाश, बायका धूम ठोकून आत पाळायच्या,कडी लावून दार आतून बंद करून घ्यायच्या, अगदी म्हाताऱ्या बायका सुद्धा पिटी उषाच्या वेगाने धावत आत जायच्या, नजरेआड व्हायच्या, मुळात बाबासाहेबांची अकोला जिल्ह्यातली प्रतिमा तशी रंगेल नेता म्हणून चर्चेतली, त्यामुळे काहीशा
अडाणी अज्ञानी असलेल्या त्याकाळच्या मतदारांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडे पाठ फिरवली, बाबासाहेसाब निवडणुकीत साफ उताणे झाले…कुठलाही बुवा प्रसिद्धीच्या झोतात या अशा पद्धतीने येतो, अवतीभोवती हे बुवा पगारावर काही खुशमस्करे आणि प्रचारक पेरून ठेवतात, जमलेल्या गर्दीला मग हे प्रचारक सतत सांगतात, हा बाबा साक्षात परमेश्व्राचा अवतार आहे, गर्दी आपोआप वाढत जाते, भय्यू महाराज त्यातलेच, संकटात सापडलेल्या कुठल्या भक्ताला त्यांनी बाहेर काढले, काही उदाहरणे देतील का, पण प्रचार आणि
प्रसार कसा करायचा, हे तंत्र भय्यू महाराजांना नेमके ठाऊक आहे, माझे नेत्यांशी कसे संबंध, विविध फोटो छापून आणायचे आणि आपले उखळ पांढरे करून घेण्याची त्यांची पद्धत, वास्तविक या राज्यातले बुवाबाजीच्याविरोधात जे लढा देतात त्या सर्वांनी म्हणजे श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, प्रशांत लीला रामदास, प्रमोद चुंचूवार, आवारे पाटील, अविनाश दुधे इत्यादींनी जे महाराजांचे कुभांड अगदी जवळून जाणून आहेत या सर्वांनी नेमके भय्यू महाराज कसे लोकांसमोर मांडायला हवे, हे लबाड व्यक्तिमत्व संपवायला हवे. भय्यू महाराजांना नेमके जाळ्यात कसे ओढायचे वाटल्यास मी सांगतो, बघा नक्की लोकांसमोर येईल ते कसे ढोंगी आहेत ते. जे काय भय्यू महाराजांच्या गोटातून पसरविण्यात येते कि ज्या राजकीय पक्षाला भय्यू महाराज जवळचे, त्या पक्षाकडे या राज्यातला मराठा समाज उचलून धरतो, हा प्रचार साफ खोटा. असे अनेक मराठा समाजातले समाजसेवी मी तुम्हाला दाखवू शकतो जे निरपेक्ष या समाजाची सेवा करतात आणि त्या त्या भागात त्यांचा प्रभाव आहे.आणि भय्यू महाराजांमुळे अमुक एखाद्या राजकीय पक्षाकडे या राज्यातला मराठा समाज ओढल्या जातो, खरे असते तर चतुर शरद पवार यांनी एक मिनिट सुद्धा भय्यू महाराजांना कडेवरून किंवा डोक्यावरून खाली उतरविले नसते. हर्षवर्धन पाटील असोत कि वळसे पाटील, मोहन भागवत असोत कि नितीन गडकरी किंवा नरेंद्र मोदी किंवा उद्धव ठाकरे, किंवा असे कितीतरी या राज्यातले भय्यू महाराज यांना फोटो काढू देणारे नेते, नेमके भय्यू महाराज कसे हे आधी जाणून घ्या मग
त्यांच्याबरोबर फोटोसेशन करा, बघणारे प्रभावित होतात, त्यांना भय्यू महाराज त्यातून खरोखरी देव वाटतात. भाजपाची ती पद्धत आहे, हिंदुत्वाचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी संघ किंवा भाजप साधू संतांना नेहमी प्रोत्साहन प्रसिद्धी देतात पण त्यातले नेमके कोणते चांगले त्यांनी खात्री करून घ्यायला हवी. होते काय लोकांना दिसते तुम्ही सारे नेते भय्यू महाराजांचे भक्त आहेत, विविध माणसे आपली खाजगी
कामे घेऊन जातात कि त्यांच्याकडे एखाद्या नेत्याकडे घेऊन जातात त्यापद्धतीने…..पत्रकार अविनाश दुधे यांनी नेमके भय्यू महाराज कसे सत्य आपल्या लिखाणातून मांडले आहे, त्यावर पुढला भाग…अपूर्ण !